मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मराठा समाज
कष्टकर्यांच्या घरातून तयार झाले कोट्यावधी मराठ्यांचे नेतृत्व
सूर्यकांत नेटके पाटील : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आला आणि संतापाचा कडेलोट झाला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षापासून संघर्शयोधा मनोज जरांगे पाटील लढा देत आहेत. मी मराठा आहे असे वारंवार सांगणार्या मराठा समाजाचे नेत्यांना डावलून एका कष्टकरी कुटूंबातील मनोज जरांगे पाटील यांच्या सारख्या सामान्य तरुणांच्या मागे महाष्ट्रातील मराठा समाजाने उभे रहावे हे सोपे नाही. मनोज जरांगे यांच्या त्यागाने हे उभे केले आहे. हे नेतृत्व अलिकडच्या काही महिन्यात राज्यातील लोकांना माहिती झाले असली तरी हे नेतृत्व सहज तयार झाले नाही. त्यासाठी या माणसाने राज्यात एक-एक माणुस जोडलाय. सोबत राहणार्या कार्यकर्त्यांवर प्रेम केलेय, गरजेच्यावेळी मदतीसाठी सतत हा माणुस उभा राहिलाय, सर्वात महत्वाचे कसला लोभ नाही.....सत्य कामाच्या बाबतीत तडजोड नाही......समाजाच्या कामासाठी सर्वस्व वाहून घेत जगणार्या मनोज जरांगे पाटलांना समाजाने नेता माणलं खरंच मोठी बाब आहे. मराठा समाजाला आता कुठे निस्वार्थी आणि समाजाच्या न्यायासाठी लढणारा खमके नेतृत्व मिळालेय.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे हा काही आजचा मुद्दा नाही. साठ - सत्तर वर्षापासून या मुद्यावर केवळ चर्चा होत राहिली. मराठा समाजाला गृहीत धरुन मराठा समाजातील राजकीय लोकांची आरक्षण देण्याबाबत मानसिकता नसल्याचेच सातत्याने दिसून आले आहे. संघर्षयोधा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रमाणपत्रे द्यावीत यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षापासून अंदोलन करत आहेत. फरक एवढाच की पुण्या, मुंबईत नव्हे तर गावखेड्यात अंदोलन करत मागणी लावून धरली. आतापर्यत अनेक वेळा उपोषणे केली, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयावर मोर्चा, शहागडपासून मुंबईपर्यत पायी मोर्चा काढणे असो की साष्ट पिंपळगाव सारख्या गावात सलग तीन महिने ठिय्या अंदोलन असो. मनोज जरांगे पाटलांनी हार मानली नाही. मी मोठ्या शहरात नाही, माझ्या गावांत अंदोलन, उपोषण करेल. एक दिवस सरकारला दखल घ्यावी लागेल असे ठासून सांगणार्या मनोज जरांगे पाटलांनी हे खरे करुन दाखवलेच नाही तर अख्या कोट्यावधी मराठा समाजाने त्यांना नेता मानले. त्यासाठी तेवढा विश्वासही मनोज जरांगे पाटलांनी दिला.
मनोज जरांगे पाटील आणि मी समवयस्क आमच्याच तालुक्यातील मातोरी (ता. शिरुर कासार, जि. बीड) येथील राहिवासी. मी नव्याने पत्रकारीतेत प्रवेश केलता. त्या काळात मनोज जरांगे पाटील यांनी चळवळीत काम सुरू केले. त्यावेळी नेमके काय करायचेय हे निश्चित नसले तरी समाजासाठी काम करायचेय एवढेच ध्येय. दुष्काळी भागातून पुढे काही वर्षानी ते जालना जिल्ह्यातील समर्थ सहकारी साखर कारखाना परिसरातील अंकुशनगर येथे स्थायिक झाले. माझे मामा हे जरांगे पाटील यांच्या शेजारी राहतात. मनोज जरांगे पाटील मोतारीहून जालना जिल्ह्यात आणि मी पत्रकारितेच्या निमित्ताने अहमनगरला स्थायिक झालो. तरी आधीच बीड जिल्ह्यात सामाजिक चळवळीतून झालेली मैत्री कायम राहिली. नगरलाही अनेक कारणांनी त्यांचे येणे- जाणे सुरू राहिले, परंतु या माणसाची सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कष्टकरी तरुणांच्या यासाठी लढण्याची तळमळ आणि संकटात सापडल्या माणसाला कोणत्याही पातळीवर जाऊन मदत करण्याची भूमिका कधीच लपून राहिली नाही. जालना, बीड जिल्ह्यातील अनेक गावखेड्यात मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची पुर्वीचीच ओळख आहे. अनेक गरीब, कष्टकरी कुटुंबांनी अनुभवलेलं आहे. पुढे त्यांनी ”शिवबा” संघटनेची स्थापना करून सामाजिक युवकांची चळवळ उभारली. हजारो तरूण सोबतीला आहेत.
मनोज जरांगे पाटील अंकुशनगरच्या मोहितेवस्तीवर राहतात. साधे कष्टकरी कुटूंब. सामाजीक कल्याणाचा ध्यास घेतलेल्या या माणसाने कुटूंबाकडे कायम दुर्लक्ष केले. जरांगे पाटील यांच्यासोबत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते सांगतात, आम्ही संघटनेतून मराठा समाज संघटनेसाठी काम सुरु ठेवले. मनोज जरांगे पाटील म्हणजे माझ्या सारख्या हजारो कुटूंबातील सदस्य. ज्या माणसाला मदत लागेल त्यासाठी हा माणुस कधीही उभा राहायचा. आर्थिक परिस्थिती आजीबात चांगली नसली तरी त्याची कधी त्यांनी फिकीर केली नाही. मध्यंतरी एका प्रकरणात शिवबा संघटनेचे चार कार्यकर्त्यावर कारवाई झाली. जो पर्यत सहकारी घरी जात नाहीत, तो पर्यत मीही माझ्या घराचे दार पाहणार नाही अशी भूमिका घेतली आणि खरोखर हा माणुस दोन-आडीच वर्ष स्वतःच्या घरी गेला नाही.
कार्यकर्त्यांवर एवढे प्रेम करणारा समाजीक संघटनेचा जगातील एकमेव अध्यक्ष आहे. राज्यातील मराठा कुटुंबाचे संघटन करण्यासाठी त्यांनी पाच वर्षांपूर्वी राज्यात संपर्क अभियान सुरू केलं होतं. आज जरी मनोज जरांगे पाटीलांना प्रत्येक माणुस ओळखत असला तरी पाच-सहा वर्षापुर्वीच या माणसाने लाखो मराठा कुटूंबे जोडलेली आहेत. लाखो कुटुंबापर्यंत पोहोचलेला हा एकमेव चेहरा आहे. त्यावेळी संपर्क अभियानची फार माध्यमाने दखल घेतली नसल्याचे त्यांना कायम खंत व्यक्त करत. विदर्भ, नाशिक जिल्ह्यात संपर्क अभियान करून नगर जिल्ह्यातही अनेक कुटूंबाला भेटले. माध्यमे दखल घेत नाहीत म्हणून कधीही मनोज जरांगे पाटलांनी हार मानली नाही. ”सहकार्याला, कार्यकर्त्याला त्रास झाला तर त्या वेदना मला होतात. माझ्या कोणत्याही सहकार्याला होणारा त्रास मी सहन करू शकत नाही.” असे सांगणारा हा व्यक्ती संघटनेच्या माध्यमातून सोबतीला असलेल्या कार्यकर्त्यावर जीवापाड प्रेम करतो.
मनोज जरांगे पाटील दिड महिन्यात दोनदा उपोषण केले. आता सध्या सुरु असलेल्या उपोषणात तर पाणी, अन्नाचा त्याग केला. प्रकृती खालावली. लोकांच्या जीवाला घोर लागलाय. लोक धाय मोकलून रडत आहेत. आरक्षणाचा काय व्हायचे ते होईल, पण तुम्ही आम्हाला हवेत असे सागंताना जवळचा नाही, तर राज्यातील कान्याकोपर्यातून आलेला मराठा रडतोय. म्हणजे आरक्षण मिळालं नाही तरी चालले, पण तुम्ही अन्नपाणी घ्या असे सांगत रडणारा माणुस मनोज जरांगे पाटलावर किती जिवापाड प्रेम करत असेल हे महाराष्ट्र अनुभवतोय.
हे प्रेम सहज तयार होत नाही. त्यासाठी विश्वास आणि त्याग हवा असतो. तो मनोज जरांगे पाटील यांनी मिळवून दिलाय. मनोज जरांगे पाटील यांनी केवळ मराठा आरक्षण यासाठी नाही तर शेतकरी प्रश्नावरही अनेक अंदोलने केली आहे. एकदा तर त्यांनी शेतीच्या बांधावर अमरण उपोषण केले होते. गावाकडच्या शेतकरी, कष्टकरी, तरूण माणसा माणसात विश्वास निर्माण करणार्याया या जिद्दी माणसाच्या ताकदीचा अंदाज लवकर आला नसला तरी दखल घ्यायची वेळ येईपर्यत मनोज जरांगे पाटील यांनी कोट्यावधी मराठा समाजाच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
( लेखक : सकाळ अॅग्रोवनचे पत्रकार आहेत.)
👉 देशाबरोबरच महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार
👉 कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे ! ; पाच जणांवर गुन्हे दाखल
👉 ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानासह विविध उपक्रमांचा राजभवन येथे शुभारंभ
👉 लाच घेताना कनिष्ठ सहाय्यक 'एसीबी'च्या जाळ्यात
👉 अहमदनगर जिल्ह्यात आणखी दोन एमआयडीसीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
