वीजबिलात ग्राहकांना 19 लाखाची मिळाली सवलत
नगर मंडलात 1 लाख 12 हजार घरगुती स्मार्ट मीटर
। अहिल्यानगर । दि.06 डिसेंबर 2025 । महावितरणच्या टीओडी स्मार्ट मिटर असलेल्या घरगुती ग्राहकांना लागू झालेल्या नवीन दरानुसार सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिवसा वापरलेल्या वीज वापरावर वीज बिलात टीओडी सवलत लागू असून, नगर मंडळात उत्तम प्रतिसाद मिळला.
एकूण 1 लाख 12 हजार 705 स्मार्ट मीटर असलेल्या घरगुती ग्राहकांना ऑक्टोबर 2025 या एका महिन्यात एकूण 19 लाख 17 हजार रुपयांची सवलत वीज बिलात मिळाली आहे.महावितरणकडून राज्यातील घरगुती वीज ग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला असून महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने पुढील पाच वर्षांसाठी निश्चित केलेल्या वीजदरामध्ये घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत जाहीर केली आहे.
त्यानुसार घरगुती ग्राहकांना टीओडीप्रमाणे वीज दरात सवलत मिळण्याचा प्रत्यक्ष फायदा दि. 1 जुलैपासून सुरु झाला असून महावितरणकडून हे स्मार्ट टीओडी मीटर ग्राहकांकडे मोफत लावण्यात येत आहेत.स्मार्ट टीओडी मीटरचे मासिक रीडिंग स्वयंचलित होणार आहे.
