​एम.आय.डी.सी. परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

अहिल्यानगरमध्ये गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक!

​एम.आय.डी.सी. परिसरात स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई


। अहिल्यानगर । दि.09 डिसेंबर 2025 ।अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या विशेष आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B.) एम.आय.डी.सी. परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीकडून गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

​पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एम.आय.डी.सी. भागात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. दिनांक ०८/१२/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर-मनमाड रस्त्यावर एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन चौकाजवळ साई पान शॉप टपरीच्या अंधारात दीपक भाऊसाहेब साळवे (वय ३१, रा. शिंगवे नाईक, ता. जि. अहिल्यानगर) हा विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून थांबलेला आढळला.

​पथकाने अत्यंत शिताफीने आरोपी दीपक साळवे याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ ३०,००० रुपये किमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) आणि १,००० रुपये किमतीचे एक जिवंत काडतूस असा एकूण ३१,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

​या आरोपीविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास एम.आय.डी.सी. पोलीस करत आहेत. पोलीस अधीक्षक श्री. घार्गे यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post