मेडिकल दुकानं उचकटून चोरी करणारे एलसीबीने केले जेरबंद!

अहिल्यानगरमध्ये मेडिकल दुकानं उचकटून चोरी करणारे जेरबंद!

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दोन सराईत चोरट्यांना अटक.


| अहिल्यानगर | दि.०७ डिसेंबर २०२५ | शहरात मेडिकलची दुकानं उचकटून चोरी करण्याच्या घटनांमुळे निर्माण झालेले भीतीचे वातावरण आता निवळले आहे. कारण, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन सराईत चोरट्यांना शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली मोटारसायकल, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ५३,८५०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री शहरातील पाटील मेडिकल, प्रणव फार्मा आणि उत्कर्ष सुपर मार्केटमध्ये शटर उचकटून रोख रकमेची चोरी झाली होती. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या गुन्ह्यांचा तातडीने तपास करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक कौशल्याचा वापर करत आरोपी १) आर्यन पप्पु शेख (वय १९) आणि २) अकबर लुकमान खान (वय ३३) (दोघे रा. दौलावडगांव, जि. बीड) यांचा शोध घेतला.


हे दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून शहरात येत असल्याची माहिती मिळताच पंचवटी हॉटेलजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींविरुद्ध अहिल्यानगर जिल्ह्यात यापूर्वी चोरी आणि घरफोडीचे सात गुन्हे दाखल आहेत. 


चोरीच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेऊन ’चोरीचा डेमो’ करून घेत नागरिकांमध्ये जनजागृती व सतर्कता निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास तोफखाना पोलीस करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post