। जामखेड । दि.15 जानेवारी 2024 । शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच जिजाऊंच्या मनात स्वराज्याचे ध्येय ठरले होते.छत्रपती शिवाजी महाराज व शंभूराजांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ कडे अतुलनीय मातृत्व,नेतृत्व व कर्तुत्व होते.मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचा अभिमान वाटतो.जर आपण एकजूट होऊन आरक्षणाच्या या लढ्यात उतरल्यास नक्कीच यशस्वी होऊ असे प्रतिपादन डॉ.पल्लवी सूर्यवंशी यांनी केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊंची ४२६ वी जयंती जामखेड साई गार्डन येथे साजरी करण्यात आली.यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन व जिजाऊ वंदना घेऊन करण्यात आली.जर जिजाऊ सारख्या एका स्त्रीची दुर्दम्य इच्छाशक्ती पाचही पातशाह्या पालथ्या घालू शकते तर,आज आपणही या सरकारला नमवून आरक्षण मिळवू शकतो.गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या पक्षात विभागलेल्या मराठा बांधवांनी एकत्र यायला पाहिजे असे विचार युवा व्याख्याता शिवगंगा मत्रे यांनी मांडले.
केदार रसाळ यांनी मुंबई येथील आंदोलनासाठी जाणाऱ्या पदयात्रेच्या नियोजनाची माहिती सांगितली.जामखेड तालुक्याच्या वतीने ५० हजार बांधवांना पुरेल एवढा कोरडा शिधा व २०० स्वयंसेवक पाठवण्यात येणार आहेत.तसेच प्रत्येक गावातून तीन ते चार वाहने निघणार असल्याचे क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.मधुकर आबा राळेभात यांनी केले.जामखेडचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व प्राध्यापक कविता जगदाळे यांनी जिजाऊ जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचालन हनुमंत निकम यांनी तर आभार प्रशांत पाटील यांनी मानले.
