शतक महोत्सवी नाट्य संमेलनात लोक कलावंतांना संधी द्या : आरती काळे नगरकर

। अहमदनगर । दि.24 डिसेंबर 2023 । अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने राज्यभरातील विविध ठिकाणी आयोजित शतक महोत्सवी नाट्यसंमेलन, विभागीय नाट्यसंमेलन व नाट्यजागर कार्यक्रमात महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला व लोक कलावंतांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लावणी सम्राज्ञी आरती काळे नगरकर यांनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.

त्यांच्या समवेत लोककलेचे अभ्यासक व नाट्य परिषदेच्या शेवगाव शाखेचे उपाध्यक्ष भगवान राऊत, जुन्या पिढीतील ज्येष्ठ शाहीर अरुण आहेर, शिवशाहीर कल्याण काळे, भारुड सम्राट हमीद सय्यद, सुनील गोंधळी, दिगंबर गोंधळी, हसन शेख पाटेवाडीकर, उपस्थित होते. या निवेदनावर लावणीसम्राज्ञी संजीवनी मुळे नगरकर, शाहीर मीरा उमप, लावणी कलावंत कविता कांबळे, गायक साईनाथ कांबळे, समई नृत्य कलावंत जालिंदर जाधव, शाहीर भारत गाडेकर आदी लोक कलावंतांच्या सह्या आहेत.

नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले हे नगर नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कलावंत कौतुक सोहळा व नाट्यप्रयोगासाठी नगरला आले होते. त्यावेळी लोक कलावंतांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील वासुदेव, पिंगळा जोशी, गोंधळ, जागरण, म्हसनजोगी, बहुरूपी, रायरंद, डक्कलवार, आराधी, भुते, भोप्या, पोतराज, शाहिरी, पोवाडा, लावणी, गण, गवळण, बतावणी, भजन, भारुड, नंदीवाले या पारंपारिक लोककला व थाळी नृत्य, समई नृत्य, लेझीम नृत्य, झांज नृत्य, बंजारा लेंगी नृत्य, धनगरी नृत्य, आदिवासी कांबड नृत्य, टिपरी नृत्य, फुगडी नृत्य, गौरी नृत्य, बोहाडा नृत्य, ढेमसा नृत्य, भोवरा नृत्य या लोकनृत्य व लोककला प्रकार सादर करण्याची संधी लोक कलावंतांना सन्मानपूर्वक उपलब्ध करून द्यावी असे या निवेदनात म्हटले आहे.

लावणी सम्राज्ञी आरती काळे यांच्या हस्ते नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post