सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी : उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ
राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम
। नागपूर । दि.15 डिसेंबर 2023 । इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोग व मेटाच्या संयुक्त विद्यमाने महिलांना सायबर विश्वात सुरक्षित ठेवण्यासाठी मिशन ई-सुरक्षा हा उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. वनामती येथे आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्र्यांच्याहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खा.सुनील तटकरे, आयोगाच्या सदस्य सचिव माया पाटोळे, सदस्य ॲड संगिता चव्हाण, दीपिका चव्हाण, आभा पांडे, उत्कर्षा रुपवते, गौरी छाब्रीया, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील व मेटाच्या अश्विनी देसाई उपस्थित होते.
समाजमाध्यमांमध्ये काही अपप्रवृत्ती सामाजिक सलोखा बिघडविण्याचा प्रयत्न करतात. महिलांची बदनामी, चारित्र्यहननासारखे प्रकार वाढले आहे. यासाठी पोलिसांचा सायबर सेल काम करतो. परंतू अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी प्रत्येकाने सामुहिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांद्वारे महिला व मुलींची बदनामी होणार नाही. तसेच समाजविघातक प्रवृत्ती बळावणार नाही. यासाठी व्यापक जनजागृतीची देखील गरज असल्याचे श्री.पवार म्हणाले.
संपुर्ण जग इंटरनेटने जोडले गेले आहे. समाजमाध्यम अविभाज्य भाग झाला आहे. यापासून आपल्याला दूर जाता येणार नाही. त्यामुळे अशा माध्यमांचा वापर करतांना प्रत्येकाने सामाजिक भान, दक्षता व खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. महिलांनी या माध्यमांचा वापर करतांना अधिक काळजी घेतली पाहिजे. वाईट प्रकार घडत असल्यास त्याची तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली पाहिजे. पोलिस विभागाने देखील अशा तक्रारींवर कालमर्यादेत कारवाई करावी, असे उपमुख्यमंत्री म्हणाले.
