आकाशवाणी केंद्रप्रमुख बाबासाहेब खराडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थांकडून सन्मान
। अहमदनगर। दि.05 जून । आपल्या गावचे भुमिपत्र आकाशवाणी केंद्रप्रमुख बाबासाहेब खराडे यांचा रिमांड होमचे विद्यार्थी ते आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रम प्रमुख हा उच्च पदापर्यंतचा प्रवास, शिक्षणासाठी अन जगण्यासाठी केलेला संघर्ष तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार कै दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर भापकर यांनी काढले. बाबासाहेब खराडे यांचा त्यांची पत्नी वर्षा यांच्यासह सेवानिवृत्तीनिमित्त नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा ग्रामपंचायत अन ग्रामस्थांकडून मानपत्र बहाल करून सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष देवराम हराळ, सरपंच दीपाली भापकर, उपसरपंच कल्पना कुलांगे, सोसायटीचे अध्यक्ष बबन भापकर, श्रीगोंदे खरेदी विक्री संघाचे माजी संचालक उत्तमराव तरटे, रूईछत्तीसीचे माजी उपसरपंच प्रभाकर भांबरे, सेवानिवृत्त सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुनाथ कण्हेरकर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भापकर गुरुजी, आकाशवाणीचे कार्यक्रम प्रमुख भैय्यालाल टेकाम, सुदाम बटुळे, वृषाली पोंदे, शशीकांत जाधव, नंदकुमार गोरे, शरद कोतकर, दीपक पिंपळे आदी उपस्थित होते.
सुधीर भापकर म्हणाले, की बाबासाहेबांच्या जीवनात लहानपणापासून संघर्ष आला. वयाच्या आठव्या वर्षी नियतीने वडीलांच छत्र हिरावून घेतले. त्याचा परिणाम आईच्या तब्येतीवर झाला. समोर अंधार असताना शिक्षणासाठी रिमांड होम गाठले. अहमदनगर आणि शेवगावमधील रिमांड होममध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर गावी परतल्यानंतर रोजगार हमीच्य कामावर जाऊन माध्यमिक शिक्षण पुर्ण करत यश मिळवले. दहावीच्या वर्गात पहिला क्रमांक पटकावला. मात्र परिस्थिती नाजूक असल्याने नोकरीसाठी आयटीआयकडून स्टेनोचा कोर्स केला. त्यानंतर आकाशवाणीमध्ये स्टेनोग्राफर म्हणून रूजू झाले. पुढे जाऊन स्टाफ सिलेक्शनची परिक्षा दिली. त्या माध्यमातून आकाशवाणीच्या औरंगाबाद, पुणे आणि अहमदनगर केंद्रावरून काम करत उच्चपदापर्यत मजल मारत ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्यामध्ये एक लेखक दडलेला आहे. आजही ते सायकलिंग मोठ्या आवडीने करतात. त्यांचा हा संघर्ष तरूणांसाठी प्रेरणादायी आहे.
सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब खराडे म्हणाले, की गावच्या सत्कारामुळे खूप ऊर्जा मिळाली. गावकऱ्यांच्या कौतुकाची ही थाप आहे. लहानपणापासून संघर्ष करत राहिलो, चुकीच्या कोणत्याही बाबींचा एकदाही विचार मनात आला नाही. आयुष्यात मी प्रत्येक घटनेतून, प्रत्येक माणसाकडून सकारात्मक आणि चांगल्या बाबी घेत राहिलो. खूप संधी आल्या मात्र आकाशवाणीचे क्षेत्र निवडले. प्रत्येकांच्या मार्गदर्शनातून आणि आशीर्वादातून आज इथपर्यत पोहोचलो आहे.
सत्कारमुर्ती मान्यवर
गावाचे सेवानिवृत्त भूमिपुत्र बाळासाहेब पिंपळे, महादेव साळवे, जालिंदर खराडे, बबनराव कोळेकर या मान्यवरांचाही ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आयएएस विजय कुलांगे यांच्या शुभेच्छा
राळेगण म्हसोबा गावचे भूमिपुत्र आणि ओडिशामधील भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलांगे यांनी दुरध्वनीच्या माध्यमातुन बाबासाहेब खराडे यांच्या कार्याचा; त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेचा आपल्या शुभेछा संदेशात उल्लेख केला. ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र रेल्वे अपघातामुळे त्यांना येणे शक्य झाले नाही.
--
💥 अंबिका महिला बँकेचे अध्यक्षा सौ आशा मिस्कीन यांना सेवाश्री पुरस्कार
Tags:
Ahmednagar
