। अहिल्यानगर । दि.01 जुन 2026 । राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे गावठी हातभट्टी दारु तयार करणार्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करण्यात आली आहे. 65 हजार 865 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गणेश रमेश गायकवाड (वय 27 वर्षे रा. फत्तेराज महाराज मंदिराजवळ, देवळाली प्रवरा, ता.राहुरी), रविंद्र दिगंबर डुकरे (रा. देवळाली प्रवरा ता.राहुरी), राजेंद्र धोंडीराम उंडे (वय 54 वर्षे रा.देवळाली प्रवरा ता.राहुरी), बापू भास्कर गायकवाड (रा.वडारवाडा देवळाली प्रवरा ता.राहुरी), रामचंद्र विठ्ठल काळे (वय 62 वर्षे रा. राहुरी फॅक्टरी ता.राहुरी) असे कारवाई झालेल्यांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिले आहे. सदर आदेशानुसार पोनि किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, विशाल तनपुरे, भगवान थोरात यांचे पथक तयार करुन राहुरी तालुक्यातील अवैध धंद्याची माहिती काढुन कारवाई करणेबाबत रवाना केले होते.
देवळाली प्रवरा गावचे शिवारातील फत्तेराज मंदिराजवळ इसम नामे गणेश गायकवाड हा बेकायदा अनाधिकृतपणे कच्चे रसायण वापरुन आंबट व उग्र वासाची गावठी हातभट्टीची दारु तयार करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने मिळालेल्या माहिती नुसार देवळाली प्रवरा गावचे शिवारामध्ये गावठी हातभट्टीचे दारु तयार करण्याचे वेगवेगळे ठिकाणी छापे टाकून कारवाई केली.
