। अहमदनगर । दि.02 ऑगस्ट 2023 । ई-पीक पाहणी हा महसुल विभागाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. १५ ऑगस्ट, २०२१ पासुन हा प्रकल्प संपुर्ण राज्यभरात राबविला जात आहे. ई पीक पाहणी ॲपद्वारे स्वतः शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांची नोंद ७/१२ वर घेणे शक्य झाले आहे. खरीप हंगाम २०२३ साठीच्या पीक पाहणी नोंदणीसाठी "ई-पीक पाहणी व्हर्जन 2 (2.0.11)" हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.
सर्व शेतक-यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै, २०२३ पासून सुरु करण्यात आलेले आहे व आतापर्यंत खरीप हंगाम वर्ष २०२३ मध्ये अहमदनगर जिल्हयातील ५६ हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी या ॲपमध्ये नोंदणी करुन आपल्या पिकांची नोंद केली आहे.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण होऊ नये यासाठी जिल्हयांतील सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगाम-२०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
