। मुंबई । दि.04 जून । ६ जुन २०२३ शिवराज्याभिषेक दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतीक विभागाने रायगड, पाचाड येथे दिनांक २ जुन ते दिनांक ६ जुन रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. त्यांमध्ये दिनांक ६ जुन रोजी सायंकाळी ६:०० ते रात्री ९:३० पर्यंत "सागरा प्राण तळमळला" हे नाटक सादर केले जाणार आहे.असं आम्हांस कार्यक्रम पत्रीकेवरून कळले आहे. हे नाटक सावरकरांच्या जीवनावर आधारीत आहे असं नाटकाच्या शिर्षकावरून कळतं.ज्या सावरकरांनी भारतीय इतिहासाची 'सहा सोनेरी पाने' हे पुस्तक लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांना एकही सोनेरी पान दिले नाही,
ज्या सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे यश हे योगायोगाने व "काकतालीच न्यायाने" असल्याचे आपल्या पुस्तकात नोंदवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा आणि पराक्रमाचा अपमान केला, शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सून सन्मानाने परत करणे या महान मानवतावादी कृतीला दोष देत आपली विषयुक्त मनोवृत्ती दाखवून दिली.अशा विकृत सावरकरांची आठवण करून देणारे नाटक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रत्यक्षरीत्या अपमान करण्यात येत आहे.असा संभाजी ब्रिगेडचा आरोप आहे.
ही योगायोगाने घडणारी कृती नसून महाराष्ट्र शासन मुद्दामहून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्यासाठी आणि सावरकरांचा उदोउदो करण्यासाठी हे नाटक शिवराज्यभिषेकदिनी सादर करणार आहे. हे जाणीवपूर्वक, विचारपूर्वक शिवप्रेमी, शिवअनुयायांना दुखावण्याच्या हेतूने योजलेली कृती आहे. हया कृतीचा संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध करीत आहे.
शासनाला खरच शिवाजी महाराजांना अभिवादन करायचे असते तर वर उल्लेख केलेल्या नाटका ऐवजी महाराजांच्या जीवनावर नाटक, पोवाडा, व्याख्यान (सत्य इतिहासावर आधारीत प्रबोधनात्मक कार्यक्रम) सादर केले असते. परंतु तसं शासनाला जाणीवपूर्वक करायचे नाही असा आरोप संभाजी ब्रिगेडचा आहे. त्याचं कारण की, आत्ताचे सरकार (शिंदे-फडणवीस) आर.आर.एस. प्रणीत असल्याने ते त्यांचाच अजेंडा राबवीत आहेत.
यांस्तव वरील बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने शिवराज्याभिषेक दिनी रायगड, पाचाडच्या कार्यक्रमात "सागरा प्राण तळमळला" हे नाटक आयोजकांनी सादर करु नये. हे नाटक रद्द करावे. अन्यथा संभाजी ब्रिगेड हे नाटक होऊ देणार नाही. हे नाटक शिवप्रेमींना सोबत घेऊन आम्ही उधळून लावू असा इशारा महाराष्ट्र सरकारला संभाजी ब्रिगेडने निवेदनाद्वारे दिला आहे. याची तात्काळ नोंद घ्यावी.अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल. असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता डॉ.शिवानंद भानुसे यांनी दिला आहे.
