। छत्रपती संभाजीनगर । दि.03 जुन 2026 । सुप्रसिद्ध व्याख्याते, कवी, लेखक, समीक्षक, सामाजिक ऐतिहासिक व राजकीय अभ्यासक व विश्लेषक डॉ.शिवानंद नारायणराव भानुसे यांची मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सूचनेनुसार मराठा सेवा संघाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे. नियुक्तीचे पत्र मराठा सेवा संघाचे अध्यक्ष डॉ.विजय घोगरे, महासचिव इंजि.चंद्रशेखर शिखरे, कार्याध्यक्ष इंजि. नवनाथ घाडगे यांनी, १ जून २०२६ रोजी दिले आहे.
डॉ.शिवानंद भानुसे हे गेल्या अठ्ठावीस वर्षापासून संभाजी ब्रिगेडमध्ये सक्रिय आहें. संभाजी ब्रिगेडच्या व मराठा सेवा संघाच्या विविध पदावर त्यांनी उत्कृष्टपणे कार्य केले आहे. त्याचबरोबर नोव्हेंबर २०२४ पासून राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी त्या पदावर उत्कृष्ट कार्य केले आहे. परंतू डॉ.शिवानंद भानुसे यांना राजकारणापेक्षा समाजकारणाची आवड असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाचा ३१ मे २०२६ रोजी राजीनामा दिला आहे.
डॉ.शिवानंद भानुसे यांची वैचारिक प्रगल्भता, विविध विषयावर सखोल अभ्यास, वैचारिक चळवळीतील अनुभव व समाजकार्य आणि जनसामान्यांच्या प्रश्नांची असणारी सखोल जाण लक्षात घेऊन मराठा सेवा संघाने मराठा सेवा संघाच्या मुख्य प्रवक्तेपदी डॉ.शिवानंद भानुसे यांची नियुक्ती केली असून ते मराठा सेवा संघ प्रणित (संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडसह) सर्व कक्षाची भूमिका प्रसारमाध्यमांद्वारे मांडणार आहे.
डॉ.शिवानंद भानुसे हे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील विझोरा येथील रहिवासी असून, सध्या ते छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयात कार्यरत आहेत. सुप्रसिद्ध वक्ते, लेखक, कवी म्हणूनही त्यांचा महाराष्ट्राला परिचय असून त्यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या २० व्या. झेप साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. त्याचप्रमाणे त्यांचा विविध साहित्य संमेलनात व कवी संमेलनात सक्रिय सहभाग असतो. भारतीय संविधानाचे आणि मराठा व इतर आरक्षणाचे गाढे अभ्यासक म्हणून ते सुपरीचीत आहेत.
गेल्या अठ्ठावीस वर्षापासून त्यांचा विविध आंदोलनात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. ते उच्चशिक्षित असून सुसंस्कृत आणि विवेकवादी आहेत. विविध टी.व्ही. चॅनलच्या माध्यमातून विविध विषयावर चर्चेसाठी त्यांचा सातत्याने सहभाग असतो. संपूर्ण महाराष्ट्रभर व देशभर त्यांचे विविध विषयावर व्याख्याने सुरू असतात. विविध वर्तमानपत्रात, साप्ताहिक व मासिकातही त्यांचे सातत्याने लिखाण सुरू आहे. ते सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व राजकीय अभ्यासक व विश्लेषक म्हणून सुपरीचित आहेत. मराठा सेवा संघाच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
