। अहमदनगर । दि.04 ऑक्टोबर 2022 । दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध लागू केलेले आहेत. याच दरम्यान दहशतवाद विरोधी पथकाकडून नगर शहरात लॉजची तपासणी सुरू आहे. बोल्हेगाव फाटा येथील साई गेस्ट हाऊसमध्ये रूम देताना प्रवाशाचे ओळखपत्र न घेता प्रवेश दिल्याने तेथील चालकाविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमलदार अमोल कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांच्या आदेशानुसार अंमलदार कांबळे व सहायक फौजदार मिया पापाभाई पठाण, अंमलदार चंद्रकांत खेडकर, सचिन भिंगारदिवे हे शहरातील लॉज तपासणी करीत असताना नगर-मनमाड रोडवरील बोल्हेगाव फाटा कमानीजवळ साई गेस्ट हाऊस
येथे प्रवाशांचे ओळखपत्र न घेताच प्रवेश दिला जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लॉज चालक राधारमण कल्पनाथ सहाय (वय 55, रा. शिवनगर देवद, सुकापुर, रायगड. हल्ली रा. साई गेस्ट हाऊस) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
