संजय बाचकर यांच्या दूरदृष्टीने विळद टाकतेय कात!

। अहमदनगर । दि.16 मे 2022।  ग्रामविकासाला मर्यादित निधी मिळतो. त्यामुळे विकासाला मर्यादा पडतात; परंतु विकासाची तळमळ आणि जिद्द असली तर अडचणींवर मात करता येते. हे विळदचे सरपंच संजय बाचकर यांनी दाखवून दिले आहे. कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून त्यांनी विळदमधील शाळेचे रुपडे पालटवले, तर शासनाने नाकारलेल्या गावाला निकषात बसवून जलशिवार योजनेची मोठी कामे त्यांनी करून घेतली. त्यासाठी वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांचा त्यांनी उपयोग करून घेतला. 


विळद हे एमआयडीसीला लागून असलेले गाव आहे. सरपंच संजय बाचकर यांनी आपल्या ओळखीचा उपयोग करून घेतला. त्यांनी ‘एल अँड टी’ कंपनीचे अधिकारी अरविंद पारगावकर व डॉ. फिरोदिया यांच्यांशी वारंवार चर्चा केली. राहुरी येथील शिवाजी प्रसारक मंडळाचं ज्ञानगंगा विद्यालय विळदला आहे. त्याची दुरवस्था झाली होती. संस्थेकडून निधी मिळण्यात अडचण होती. 


‘एल अँड टी’ कडून सामाजिक दायित्व निधी त्यांनी मिळवला. त्यातून शाळेसाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा, पाण्याची टाकी बांधली. त्यामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शाळेत रंगरंगोटी करण्यात आली. पडवीच्या फरशा बदलण्यात आल्या. शाळेला ५५ इंची एलडीई टीव्ही देण्यात आला. मराठी शाळेचे पत्रे बदलण्यात आले.

पहिली ते चौथीच्या वर्गाला खोल्या बांधण्यात आल्या. ‘सन फॉर्मा’कंपनीच्या माध्यमातून स्ट्रक्चरल बांधण्यात आले. अंगणवाड्यांना शौचालये बांधून देण्यात आली. एलईडी, इनव्हर्टर, वायफाय, किचन शेडसाठी ‘एल अँड टी’कंपनीने भरीव सहकार्य केले.

विळदचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत झाला नव्हता. त्यामुळे जलसंधारणाची कामे करता येत नव्हती. जिल्हाधिकारी, सचिव आदींशी सरपंच संजय बाचकर यांनी चर्चा केली. सचिव एकनाथ डौले यांच्या वारंवार भेटी घेतल्या. नेमके त्याच काळात दोन-तीनदा रेल्वेच्या धडकेने वनगायी ठार होण्याचे प्रकार घडले.

हे केवळ रेल्वेच्या एका बाजूला पाणी नसल्याने होत होते. पाण्यासाठी वनगायांना वारंवार लोहमार्ग बदलावा लागत होता. ही बाब सरपंचांनी डवले यांच्या निदर्शनास आणली. त्यांचेही मन द्रवले. त्यानंतर वेगाने चक्रे फिरली. केवळ विळदसाठी राज्याच्या अध्यादेशात बदल करण्यात आला. विळदचा जलशिवार योजनेत समावेश झाला आणि नंतर कोट्यवधी रुपयांची कामे झाली. 

Post a Comment

Previous Post Next Post