| पुणे | दि.३० जून २०२५ | सारथी संस्थेच्या कामाला गती देण्याचे काम शासनामार्फत करण्यात येत असून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. ही संस्था नवीन असून या संस्थेच्या विविध योजनांचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना होण्यासाठी सारथीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी येणार्या काळात सामाजिक जबाबदारी म्हणून नवीन विद्याथ्यांना मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास सारथीचे संचालक उमाकांत दांगट, मधुकर कोकाटे, डॉ. नवनाथ पालकर, किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शिवाजी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनात काम करताना लोकाभिमुख काम करुन, समाजातील दुर्बल व वंचित घटकांना मदत करावी. या कामात सातत्य ठेवून संस्थेचा नावलौकिक वाढवा. सारथी ही संस्था राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कार्यरत असून, त्यांच्या नावाला साजेसे असे काम उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी करावे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.
Tags:
Maharashtra