नमामि गंगे या प्रकल्पासाठी आयआयटी, कानपूर सोबत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचा लवकरच सामंजस्य करार : कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील


। अहमदनगर । दि.07 मे 2022। भारत सरकारने गंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी नमामि गंगे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी भरीव तांत्रिक योगदान देण्याच्या दृष्टीने महात्मा फुले कृषि विद्यापीठ सदैव तयार आहे. या प्रकल्पासाठी आयआयटी, कानपूर सोबत संपूर्ण देशातून राहुरीच्या महात्मा फुले कृषि  विद्यापीठाची निवड ही निश्चितच भूषणावह बाब आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील यांनी केले. 

लवकरच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व आयआयटी, कानपूर यांच्यामध्ये याबाबतचा सामंजस्य करार होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.

यावेळी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक विनोद तारे, इंजि. राकेश मिश्रा, पुणे येथील हिंदुस्तान ऍग्री बिझनेस लिमिटेडचे प्रमुख गणेश कुलकर्णी, डेरे ऍग्रो इंडियाचे संचालक इंजि. संदिप डेरे, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार, सह प्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे आणि विभाग प्रमुख उपस्थित होते.

प्रा. विनोद तारे यावेळी म्हणाले की, नमामि गंगे प्रकल्पासाठी कृषि विषयक जे जागतिक तंत्रज्ञान चांगले आहे ते भारतात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जपानमधील मातीविरहित मेम्ब्रेन तंत्रज्ञान भारतात आणून ते आपल्यासाठी कसे फायदेशीर ठरेल हे पाहणे गरजेचे आहे. नमामि गंगे या प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, भारतीय पर्यावरण, हवामान याविषयी मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

हा असा प्रकल्प आहे की भारतीय वातावरणात त्याचा कसा वापर करता येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भारतातील नद्या व त्यातील पाणी हे भारतीय शेतीकरिता फार महत्वाचा विषय आहे. नद्या शाश्वत राहण्याच्या दृष्टीने भविष्यात फार मोठे काम करावे लागणार आहे. 

पाण्याची शाश्वतता भारतीय नागरिकांच्या दृष्टीने, त्यांचे जीवन शाश्वत करण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. नद्यांना सतत वाहते बनवणे तसेच त्यातील पाणी पिण्यायोग्य कसे राहील याविषयी प्रयत्न करणे गरजेचे आहे. स्वच्छ पाणी असणाऱ्या चांगल्या नद्या पुढील पिढीला सोपवणे तसेच त्यांचे संवर्धन करणे व सर्वार्थाने चांगली कृषी  धोरणे तयार करणे गरजेचे आहे.

यावेळी गणेश कुलकर्णी यांनी मेम्ब्रेन तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. डॉ. सुनील गोरंटीवार यांनी कास्ट प्रकल्पाने आतापर्यंत केलेल्या विविध हवामान तसेच जल व्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानाविषयी माहिती दिली. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या हस्ते कास्ट प्रकल्पाला देशात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉ. सुनील  गोरंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील  विभाग प्रमुख उपस्थित होते.

---------------

खालील बातम्या वाचा...

दि अंबिका महिला बँकेच्या अध्यक्षपदी सौ.आशाताई मिस्कीन  

घरगुती गॅसची किंमत 1 हजाराच्या टप्प्यात

जिल्हा परिषदेचे सीईओ आशिष येरेकर यांनी पदभार स्वीकारला 

बियाणे आणि खतांचा पुरेसा पुरवठा करा: उपमुख्यमंत्री अजित पवार

Post a Comment

Previous Post Next Post