बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर, सर्वांनाच सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे : मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
| पंढरपूर | दि.०6 जुलै २०२५ | पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी श्री कैलास दामु उगले, सौ. कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सौ. अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील,
विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
- आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.