। रत्नागिरी । दि.25 ऑगस्ट । केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांना महाड न्यायालयाने मंगळवारी रात्री उशिरा जामीन मंजूर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत नाशिक आणि पुणे येथे तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या. महाड येथील रायगड दंडाधिकाऱ्यांसमोर नारायण राणे यांना हजर करण्यात आले. पोलिसांनी नारायण राणे यांच्या सात दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद फेटाळून लावला आणि नारायण राणे यांना जामीन मंजूर केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल एका गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर राज्य सरकारने मंगळवारी सूडबुद्धीने कारवाई केली असून राणे यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथून अटक करण्यात आली. दरम्यान, राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज स्थानिक कोर्टाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र तिथेही त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देण्यात आला.
तथापि, राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबई, पुणे, कोकणासह राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून जनक्षोभ उसळला आहे. राणे यांनी प्रथम पोलीस कारवाईवर आक्षेप घेतला आणि अटक वॉरंटची मागणी करण्यात आली. त्यावर सत्र न्यायालयाने व उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्याने आणखी वॉरंटची वाट पाहण्याची गरज नाही, असे पालकमंत्र्यांनी पोलीस अधीक्षकांना सांगितल्यानंतर सूत्रे हलली व राणे यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, भाजपकडून सरकारवर गंभीर आरोप करण्यात आला. रत्नागिरी पोलीस नारायण राणे यांना अटक करण्यासाठी आले, मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा अटक वॉरंट नव्हता. पोलीस अधीक्षकांकडे आम्ही वॉरंटची मागणी केली. मात्र ते वॉरंट दाखवू शकले नाहीत, असा दावा भाजपचे प्रमोद जठार यांनी केला. राणे यांना अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकण्यात आला. पोलीस अधीक्षकच तसं बोलले आहेत. कोणत्याही वॉरंटशिवाय केंद्रीय मंत्र्यांवर अशी कारवाई करायला हे काय जंगलराज आहे का?, असा सवालही जठार यांनी केला.
जठार हे माध्यमांशी बोलल्यानंतर काही वेळातच अटकेची कारवाई करण्यात आली. राणे यांची शुगर वाढली होती तसेच रक्तदाबही वाढला होता. त्यामुळे वैद्यकीय तपासणी करून नंतर त्यांना कोर्टाच्या दिशेने नेण्यात आले. यावेळी राणे समर्थकांनी तीव्र विरोध केला. मात्र, पोलिसांनी सर्वांना हटवत कारवाई केली.
