पोलिसांना पुढे करुन सरकारने दहशत केली! : आ.विखे

। अहमदनगर । दि.25 ऑगस्ट । केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेचा आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी निषेध केला आहे.पोलिसांना पुढे करुन सरकारने राज्यात एक प्रकारची दहशतच निर्माण केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

आमदार विखे पाटील पुढे म्हणाले की, मंत्री नारायण राणे यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा राहणार आहे. राज्यात केंद्रीय मंत्र्यांच्या सुरु असलेल्या यात्रांना मिळत असलेल्या प्रतिसादामुळे अस्वस्थ झालेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.

यापूर्वी भाजपाच्या नेत्यांवर शिवसेनेकडून अतिशय खालच्या स्तरावर जाऊन टिका केली गेली होती. त्यावेळी पोलिसांना कायदा आवठला नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आजपर्यंतच्या दसर्‍या मेळाव्यातील शिवसेना नेत्यांची वक्तव्येही पोलिस प्रशासनाने दुर्लक्षित केली.

मग, पोलिसांना कायद्याचा साक्षात्कार अत्ताच कसा झाला? असा सवाल त्यांनी केला. पोलिस बळाचा वापर करुन राज्यात सरकारने निर्माण केलेले वातावरण आणि दहशत अतिशय दुर्देवी असून, भाजप कार्यालयावर आणि कार्यकर्त्यांवर झालेले हल्ले सुध्दा सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

राज्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय संयम बाळगला आहे. परंतु, अधिक अंगावर येण्याचा कोणी प्रयत्न केलाच तर जशास तसे उत्तर देण्याची आमची तयारी असल्याचा इशाराही विखे यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post