घोडेश्‍वरी देवीच्या मंदीरातील चांदीचे दागीने चोरीला


नगर, (दि.20 नोव्हेंबर) : स्क्रू ड्रायव्हर व पक्कडच्या सहाय्याने मंदिराच्या गेटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मुर्तीच्या अंगावरील चांदीचे दागीने चोरुन नेले आहे. ही घटना गुरुवारी दि.19 रोजी पहाटेच्या सुमारास नेवासा तालुक्यातील घोडेगाव घोडेश्‍वरी देवीच्या मंदिरात घडली आहे.


घोडेगाव येथील मंदिराच्या पुजार्‍यांनी बुधवारी रात्री नेहमी प्रमाणे मंदिर व्यवस्थित बंद केले होते. पहाटे साफसफाई व पूजा करण्यासाठी ते मंदिरामध्ये आले असता त्यांना मंदिराचे मुख्य द्वाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत समोर आले. त्यांनी आत जावून पहाणी केली असता मंदिरातील मुर्तीच्या अंगावरील चांदीचे दागीने नाहिसे झाल्याची त्यांच्या निदर्शनात आले.


या घटनेची माहिती त्यांनी श्री घोडेश्‍वरी देवी महादेव अ‍ॅण्ड मारुती टेम्पल ट्रस्ट, घोडेगाव यांना तसेच सोनई पोलिस ठाण्याला कळविली. या घटनेची माहिती मिळातच सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक रामचंद्र करपे पोलिस पथकासह तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाची पाहणी करुन त्यांनी चौकशी केली. याबाबत दुपारी उशिरापर्यंत चोरीच्या गुन्हयाची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Post a Comment

Previous Post Next Post