बेरोजगार युवा अभियंत्यांचे ठाकरेंना साकडे
नगर, (दि.20 नोव्हेंबर) : अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही वा ठेकेदारीने कामे करण्याची तयारी असली तरी बडे ठेकेदार व शासकीय अधिकारी संधी मिळू देत नाहीत, म्हणून नगरमधील काही बेरोजगार तरुण अभियंत्यांनी मंगळवारी येथील हुतात्मा स्मारकात लाक्षणिक अन्नत्याग आंदोलन केले.
हुतात्मा स्मारकाजवळील छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्यावतीने एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करून अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे प्रश्न याबाबत सरकारचे लक्ष वेधले गेले.
‘‘पैसे नसतात म्हणून इंजिनिअर मुले भाजी व फुले विकत आहेत, मोठे कॉन्ट्रक्चर अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या नव्या पोरांना कामे मिळू देत नाही, त्यामुळे उध्दव काका... आम्हाला वाचवा, आमची आर्त हाक ऐका. आम्ही अभियांत्रिकीची मुले आयुष्यातून उठण्याची वेळ आली आहे. काका... आम्हाला वाचवा,’’ अशी विनवणी या आंदोलनातून करण्यात आली, अशी माहिती स्मायलिंग अस्मिता संस्थेचे प्रमुख यशवंत तोडमल यांनी दिली. राज्याचे विरोधी पक्षनेते मंदिराच्याबाबतीत लगेच आगडोंब उठवतात आणि कष्टकरी शेतकरी विद्यार्थ्यांसाठी चकार शब्द काढत नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनात तोडमल यांच्यासह सचिन साप्ते, अक्षय खडके, अक्षय परभणे, धीरज कुमटकर, अक्षय पवार सहभागी झाले होते. फेसबुकवर हे आंदोलन लाईव्ह करण्यात आले. त्यात शुभम मिसाळ (कर्जत), ऋषिकेश दुसुंग व आसिफ शेख (पाथर्डी), वाहेद शेख (मुंबई) यांच्यासह बीड, लातूर, सांगली, कोल्हापूर, पुणे व औरंगाबाद येथूनही बेरोजगार अभियांत्रिकी युवक सहभागी झाले होते.
