मनपाच्या महिला सफाई कर्मचार्‍यास मारहाण


 नगर, (दि.24 नोव्हेंबर) :  मनपाच्या महिला सफाई कर्मचार्‍यास मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने हॉकी स्टिकने या महिलेला मारहाण केली असून, जखमी झाल्यामुळे या महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.


महापालिकेच्या महिला सफाई बालिकाश्रम रस्त्यावरील कवडे मळा भागात ही घटना घडली आहे. स्वच्छता नियमितपणे केली जात नसल्याचा खोटा आरोप करत ही मारहाण केल्याचे लोखंडे यांनी सांगितले.


महापालिका कामगार युनियनने या घटनेचा निषेध करत संबंधित भागातील सफाईचे कामकाज बंद करण्याचा पवित्रा घेतला आहे.मारहाण झालेल्या महिलेचा मुलाने यात हस्तक्षेप केल्यानंतर त्यासही मारहाण करण्यात आल्याचे लोखंडे यांनी सांगितले. 

 

मारहाणीनंतर या भागातील सफाईचे काम लगेच बंद करण्यात आले, तर आरोपीस अटक न झाल्यास मंगळवारी सकाळपासून शहरातील सर्वच स्वच्छतेचे कामकाज बंद करण्याचा इशारा लोखंडे यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post