आघाडी सरकारकडून विश्‍वासघात : कर्डिले

आघाडी सरकारकडून विश्‍वासघात : कर्डिले

नगरमध्ये भाजपकडून वीजबिलांची होळी


नगर, (दि.24 नोव्हेंबर) : महावितरणने टाळेबंदीच्या काळात राज्यातील जनतेला चुकीची व भरमसाठ बिले पाठविली होती. या बिलांबाबत नागरिकांना सवलत देण्याचे शासनाने जाहीर देखील केले होते. मात्र, आता या वाढीव बीलाबाबत सरकारने यु टर्न घेत जनतेचा विश्‍वासघात केला असल्याची टीका माजी मंत्री व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी केली.


नगर बाजार समिती येथे भाजपाच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात वीजबिलांची होळी करुन आंदोलन करण्यात आले. यावेळी कर्डिले म्हणाले की, कोरोना टाळेबंदीच्या काळात उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडल्यामुळे सर्वसामान्य जनता आर्थिक संकटात सापडली होती. अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे सर्वसामान्य कष्टकरी जनतेला अर्थसहाय्य करणे गरजेचे होते.


मात्र तसे न करता वाढीव वीजबिले पाठवली. नंतर सवलत देऊ, असे सांगितले आणि आता जनतेचा विश्‍वासघात करत पूर्ण बील भरावे लागेल, कोणतीही सवलत मिळणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधुंद सरकारला जाग आणण्यासाठी आज भाजपाच्यावतीने राज्यभर वीज बिलांची होळी करुन आंदोलन करण्यात येत आहे.


यावेळी आ बबनराव पाचपुते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, अक्षय कर्डिले, सभापती अभिलाष घिगे, उपसभापती संतोष म्हस्के, मनोज कोकाटे, दिलीप भालसिंग, विलास शिंदे, बाळासाहेब महाडीक, रमेश पिंपळे, रेवणन्नाथ चोभे, बबन आव्हाड, गिताराम नरवडे, सुमित कोठुळे, देविदास आव्हाड, सुरेश सुंबे शुभम भांबरे, मधुकर मगर आदींसह भाजपा कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले की, हे आघाडी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरत असून कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही. जनतेचे प्रश्‍न सोडवण्यापेक्षा एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यात सरकारचा वेळ जात आहे. अतिवृष्टी, कोरोना आदी संकटांना सामोरे जाण्यासाठी सरकारकडे कोणतेही नियोजन नाही. त्यामुळे जनता आता फार काळ या सरकारला खुर्चीवर बसू देणार नाही.

Post a Comment

Previous Post Next Post