डाक विमा योजनेतील वारसाला तेवीस लाख पन्नास हजारांचा धनादेश

डाक विमा योजनेतील वारसाला तेवीस लाख पन्नास हजारांचा धनादेश

। अहिल्यानगर । दि.16 डिसेंबर 2025 । भारतीय डाक विभागाच्या टपाल जीवन विमा अंतर्गत विमा पॉलिसी घेतलेल्या ग्राहकाने दरमहा प्रमाणे नियमित पाच वर्षे हप्ते भरले होते, त्यानंतर 11 ऑगस्ट 2025 रोजी त्या पॉलिसीधारकाचे वयाच्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. या निधनानंतर वळवी कुटुंबावर मानसिक व आर्थिक असा दुहेरी आघात झाला.


दरम्यान या प्रकरणात बळवंत रामा वळवी हे हातगाव येथे आरोग्य विभागात आरोग्य सेवक या पदावर कार्यरत होते, यावेळी त्यांनी बोधेगाव येथील सब पोस्ट मास्तर श्री रामेश्वर ढाकणे यांच्यामार्फत पोस्टल लाइफ इन्शुरन्स पॉलिसी उतरवली होती. त्यांच्या दुर्दैवी निधनानंतर मृत व्यक्तीच्या पत्नी यांनी आवश्यक कागदपत्रे पोस्ट ऑफिस येथे सादर केले, 

त्यानंतर टपाल विभागामार्फत त्वरित कार्यवाही करत दावा मंजूर करण्यात आला. अहिल्यानगर भारतीय डाक विभागाचे वरिष्ट डाकअधीक्षक विकास पालवे यांच्या हस्ते 23 लाख 50 हजार रुपयांचा धनादेश वारस श्रीमती सरिता बळवंत वळवी यांना देण्यात आला. पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर मुलांच्या शिक्षणासाठी तसेच भविष्यातील उदरनिर्वाहासाठी वळवी कुटुंबीयांना मोठी आर्थिक मदत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी सिनिअर पोस्टमास्तर हेमंत खडकेकर, हनुमंत चव्हाण, बनकर उपस्थित होते. यावेळी टपाल विभागाच्या विविध योजनेची माहिती व बचतीचे महत्त्व सांगण्यात आले.

पोस्टाची विमा योजना सर्वाधिक सुरक्षित
डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन विमा ही योजना कर्मचारी, शेतकरी, जोखीमीचे काम करणारा मजूर वर्ग तसेच व्यापारी वर्गासाठी चांगली आहे.  या योजनेमध्ये कमीत कमी हप्ता व जास्तीत जास्त लाभ मिळतो. ग्रामीण भागातील नागरिक तसेच लघुउद्योजक यांच्यासाठी 10 लाखांचा तर कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, डिप्लोमाधारक व विविध पदवीधारकांना 50 लाखापर्यंत विमा घेता येतो. या योजनेमध्ये आयकर सवलत, कर्जाची सोय, वारसदाराचे नाव नोंदवण्याची सोय, भारतात कुठेही पोस्ट ऑफिस मध्ये प्रीमियम तसेच ऑनलाईन प्रीमियम भरण्याची सुविधा, तसेच नवीन टपाल जीवन विमा पॉलिसीवर GST बंद झाला असून या सर्वाधिक सुरक्षित विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन वरिष्ट डाक अधीक्षक विकास पालवे यांनी केले.

 

Post a Comment

Previous Post Next Post