। अहिल्यानगर । दि.18 डिसेंबर 2025 । शहरातील कचरा संकलनाचे काम करणार्या घंटागाड्यांना आता चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. जुनी महापालिका पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 घंटागाड्यांच्या बॅटर्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, कचरा वाहतूक करणार्या यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे.
स्वयंभू ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत शहरात घनकचरा उचलण्याचे काम केले जाते. दि. 15 डिसेंबर रोजी काम आटोपल्यानंतर सर्व 45 घंटागाड्या पार्किंगच्या मोकळ्या जागेत लावण्यात आल्या होत्या. दुसर्या दिवशी सकाळी 7 वाजता चालक कामावर आले असता, वाहने सुरू होत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तपासणी केली असता 10 गाड्यांच्या बॅटर्या गायब असल्याचे दिसून आले.
सुपरवायझर अस्लम शेख यांनी तातडीने कंपनीला याबाबत माहिती दिली.चोरट्यांनी एकूण 22 हजार 500 रुपये किमतीच्या एक्साईड कंपनीच्या बॅटर्या चोरून नेल्या आहेत. यामध्ये 40 वॅटच्या पाच आणि 60 वॅटच्या पाच बॅटर्यांचा समावेश आहे. कोतवाली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 305 (क) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. भरवस्तीत असलेल्या पार्किंगमधून बॅटर्यांची चोरी झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस आता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत.
