। अहिल्यानगर । दि.18 डिसेंबर 2025 । संस्कार अकॅडमीच्या वतीने नुकतेच ऍन्युअल स्पोर्ट डेचे आयोजन उत्साहात करण्यात आले. यंदाच्या स्पोर्ट डेची संकल्पना ग्रँड ऍन्युअल स्पोर्ट डे विथ ग्रँड पेरेंट्स अशी ठेवण्यात आली होती. या निमित्ताने अकॅडमीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांसोबत खेळातील सहखेळाडू बनवून विविध गमतीशीर व मनोरंजक खेळ घेण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह आजी-आजोबांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. खेळांच्या माध्यमातून केवळ मनोरंजनच नव्हे, तर मोबाईलच्या आहारी गेलेल्या आजच्या तरुणाईला मोबाईल सोडा व मैदानाकडे चला असा सकारात्मक संदेश आरणगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अकॅडमीच्या संचालिका प्राध्यापिका अमृता देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. आजच्या धावपळीच्या व मोबाईलप्रधान युगात आजी-आजोबांचे स्थान आणि त्यांचे कुटुंबातील महत्त्व याविषयी त्यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन केले. या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
