। मुंबई । दि.20 डिसेंबर 2025 । शालिनीताई पाटील या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत्या. वयाच्या 94 व्या वर्षी शालिनीताई पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील माहिम येथील राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
शालिनीताई पाटील यांनी वसंतदादांना खंबीर साथ दिली होती. राज्यातील अनुभवी राजकारणी म्हणून त्यांची ओळख होती.शालिनीताई पाटील यांचं वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झालं आहे.
सत्यशोधक विचारांचे प्रणेते ज्योतिजीराव फाळके पाटील यांच्या त्या कन्या होत. त्यांनी कायद्याचे शिक्षण घेत वकिलीची पदवी घेतली होती. सांगली जिल्हा लोकल बोर्डाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली.
विचारस्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि निर्भीड राजकीय भूमिका यासाठी ओळखल्या जाणाऱ्या डॉ. शालिनीताई पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात वेगळी छाप उमटवली. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या डॉ. शालिनीताई पाटील यांनी खासदार व आमदार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली. राज्याच्या महसूल मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
