नगर, (दि.24 नोव्हेंबर) : सोलापूर रस्त्यावरील छावणी परिषदेच्या वाहन प्रवेशकर टोलनाक्यावर कर्मचार्यांना हप्ता मागत जीवे मारण्याची धमकी देऊन नाका लुटण्याचा प्रयत्न करणारे तिघे गजाआड झाले.भिंगार कॅम्प पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांना दरेवाडी परिसरात सापळा लावून काही तासांत ताब्यात घेण्यात आले.
टोलनाका लुटण्याचा प्रयत्न शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास झाला. या घटनेतील सराईत गुन्हेगार संदीप ऊर्फ म्हम्या शरद शिंदे (बुरुडगाव रोड, भागवत चाळ, नगर) यास लगेच रात्रीच भिंगार कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेतले. संदीप वाकचौरे, प्रकाश भिंगारदिवे या दोघांना दरेवाडी परिसरात सापळा लावून अवघ्या काही तासांतच अटक करण्यात आली.
इतर आरोपी विक्रम गायकवाड, बाबा आढाव (वाळुंज पारगाव, ता. नगर) ही दोघे अद्याप फरार असून पोलिस त्यांचा कसून तपास करत आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली नगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या सूचनेनुसार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील सुरसे, देशमुख, शिंदे, राजेंद्र सुद्रिक, द्वारके, समीर शेख आदींसह अन्य पोलिस कर्मचार्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
