। अहिल्यानगर । दि.19 जानेवारी 2026 । आगामी अडीच वर्षांसाठी महापालिकेच्या महापौरपदासाठी येत्या गुरूवारी (दि.22) रोजी मुंबईत मंत्रालयात आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे महापौरपदाच्या आरक्षणाबाबत राजकीय वर्तुळासह नगरकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेवर भाजपा- राष्ट्रवादी युतीचा झेंडा फडकला आहे. भाजपाने 25 आणि राष्ट्रवादीने 27 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महापौरपदावर दावा कोण करणार, याबाबतची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
महापालिकेचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष शहराचा प्रथम नागरिक कोण होणार, याकडे लागले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील 29 महापालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची अधिकृत सोडत गुरुवार, 22 जानेवारी रोजी मंत्रालयात काढली जाणार आहे. दरम्यान, गत पाच वर्षामधील पहिले अडीच वर्ष महापौरपद हे खुल्या प्रवर्गासाठी होते तर नंतरचे अडीच वर्ष अनुसुचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षीत होते.
आता यावेळी महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षीत राहणार, हे महत्वाचे ठरणार आहे. परंतु सध्या तरी महापौरपदावर अनेकांनी डोळा ठेवला असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. महापालिकेत तत्कालीन शिवसेनेचे सर्वाधिक चार महापौर झाले आहेत. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसला तीन वेळा तर भाजपा आणि काँग्रेसला एकदा संधी मिळाली आहे.
