। अहिल्यानगर । दि.15 जानेवारी 2026 । दत्तनगर (वडगाव गुप्ता) येथे गावठी कट्टा आणि लोखंडी कोयता घेऊन दहशत करणार्या सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.सहायक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना माहिती मिळाली की, काही इसम गावठी कट्टा आणि लोखंडी कोयते घेऊन दत्तनगर वडगाव गुप्ता शिवारात दहशत करून फिरत आहेत. पोलिस पथकाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता चार ते पाच जण हातात लोखंडी कोयते घेऊन फिरताना दिसले.
पोलिसांना पाहताच ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना पाठलाग करून पकडले. त्यांनी त्यांची नावे हर्षद गौतम गायकवाड (वय 21, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता), वैभव गौतम गायकवाड (वय 19, रा. मुळा डॅम वरवंडी, ता. राहुरी, हल्ली रा. दुधडेअरी चौक, वडगाव गुप्ता ), भूषण चंद्रकांत गाढवे (वय 22, रा. चांदा, ता. नेवासा, हल्ली रा. इंजिनिअरिंग कॉलेजजवळ विळदघाट), मनजित मदनलाल किसाना (वय 24, रा. दुधडेअरी चौक नवनागापूर), स्वप्नील व्यंकटेश म्हेत्रे (वय 21, रा. दत्तनगर, वडगाव गुप्ता), असे असल्याचे सांगितले.
पकडलेल्या आरोपींची अंगझडती घेतली असता हर्षद गायकवाड याच्या कमरेला एक गावठी कट्टा व त्यामध्ये एक जीवंत काडतूस मिळून आले. वैभव गायकवाड, भूषण गाढवे, स्वप्नील म्हेत्रे यांच्या हातात तीन लोखंडी कोयते मिळून आले. गावठी कट्टा व लोखंडी कोयते जप्त केले असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी, राकेश खेडकर, संदीप पवार, राजु सुद्रीक, टेमकर, आडबल, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, ज्ञानेश्वर आघाव, अक्षय रोहोकले यांनी ही कारवाई केली.
