शिवसेना-राष्ट्रवादी पक्षचिन्हावरील सुनावणी लांबणीवर
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी होणार सुनावणी
| मुंबई | दि.21 जानेवारी 2026 | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाशी निगडित असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष व निवडणूक चिन्हावरील वादाची सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. बुधवारी 21 जानेवारी रोजी सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी अपेक्षित होती.
मात्र न्यायालयीन कामकाजामुळे प्रत्यक्ष सुनावणी होऊ न शकल्याने आता या प्रकरणावर येत्या शुक्रवारी निर्णय होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या वादाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष व त्याच्या निवडणूक चिन्हासंदर्भातील वाद सर्वोच्च न्यायालयात दीर्घकाळापासून प्रलंबित आहे.
आजची सुनावणी खंडपीठाच्या दैनिक कार्यसूचीत क्रमांक 37 वर असल्याने सविस्तर युक्तिवाद होईल की केवळ पुढील तारीख दिली जाईल, याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये आधीपासूनच संभ्रम होता. अखेरीस वेळेअभावी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने यावर तातडीने निर्णय घ्यावा, असे मत ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केले.
