जादूटोणाविरोधी जनजागृती समितीसाठी ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविले


। अहिल्यानगर । दि.15 जुलै 2026 । शासनाच्या 'महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समूळ उच्चाटन करणे अधिनियम, २०१३' तसेच शासन निर्णयानुसार जिल्हास्तरावर जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती, प्रचार व प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती गठित करण्यात येत असून, समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी ३१ जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे.


समितीवर ७ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यामध्ये किमान दोन महिला सदस्यांचा समावेश अनिवार्य राहील. समाजसेवक, अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींनी अर्ज करावेत. विहित नमुन्यातील अर्जासोबत उमेदवाराचा स्वपरिचय, अलीकडील पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आधार कार्ड अथवा अन्य ओळखपत्राची प्रत तसेच संबंधित क्षेत्रातील सामाजिक कार्याचा संक्षिप्त अहवाल आणि आवश्यक असल्यास त्यासंबंधीचे पुरावे जोडणे आवश्यक आहे.


अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून, अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सावेडी नाका, नगर-मनमाड मार्ग, अहिल्यानगर – ४१४००३ या पत्त्यावर कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष किंवा टपालाद्वारे स्वीकारण्यात येतील. ३१ जुलै २०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी spldswo.nagar@gmail.com या ई-मेल पत्त्यावर किंवा ०२४१-२३२९३७८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही सहायक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी कळविले आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post