सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात ‘अहिल्यानगर’ राज्यात अव्वल; ४.७५ कोटींच्या विक्रमी निधीचे संकलन
राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा विशेष सन्मान
। अहिल्यानगर । दि.11 डिसेंबर 2025 । सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनात अहिल्यानगर जिल्ह्याने आपली अव्वल कामगिरी कायम राखत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. जिल्ह्याने यावर्षी तब्बल ४ कोटी ७५ लाख रुपयांचा विक्रमी निधी संकलित केला असून, या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा आज मुंबईतील राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचा राज्यस्तरीय शुभारंभ व गौरव सोहळा आज मुंबईतील राजभवन येथे पार पडला. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे (नि.) उपस्थित होते. अहिल्यानगर जिल्ह्याने मागील वर्षीच्या उत्कृष्ट कामगिरीची पुनरावृत्ती करत, सलग दुसऱ्या वर्षी राज्यात सर्वाधिक निधी संकलन करण्याचा मान मिळवला आहे.
जिल्ह्याच्या या यशामध्ये विविध शासकीय विभाग, संस्था व नागरिकांचा मोठा वाटा आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा संस्थान, शिर्डी ( १ कोटी रुपये), महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी, अहिल्यानगर जिल्हा परिषद व शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (ST महामंडळ) व पोलीस विभाग आदी संस्था व शासकीय विभागांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
संकलित झालेला हा निधी देशासाठी प्राणांची आहुती देणारे शहीद जवान, त्यांचे कुटुंबीय, दिव्यांग सैनिक व आजी-माजी सैनिकांच्या विविध कल्याणकारी योजना व पुनर्वसनासाठी वापरला जाणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोरडे यांनी दिली.
