। लातूर । दि.12 डिसेंबर 2025 । माजी केंद्रीय गृहमंत्री तथा राजकीय क्षेत्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू व्यक्तिमत्त्व लातूरचे सुपुत्र शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवार, दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता येथील देवधर या त्यांच्या निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने एक अनुभवी, सुसंस्कृत, चारित्र्यसंपन्न राजकारणी गमावला असून, कॉंग्रेस पक्षाची अपरिमित हानी झाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राच्या शालीनता, सुसंस्कृततेचा लौकिक जपणारे आणि तो राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणारे नेतृत्व म्हणून ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर सदैव स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी लोकसभा अध्यक्ष, केंद्रीय मंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या निधनामुळे राजकारण- समाजकारणातील उत्तुंग अशा मार्गदर्शक नेतृत्वाला मुकलो आहोत, अशी शोकभावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी संसदेशी निगडित अनेक अभिनव उपक्रमांना आवर्जून चालना दिली. चाकूरकर यांचा वकील म्हणून संविधानाचा गाढा अभ्यास होता. त्यातूनच त्यांनी लोकसभेतील संसदीय कार्य प्रणाली आणखी बळकट केली. तत्वनिष्ठ, अभ्यासपूर्ण आणि ठामपणे मांडणी करणारे नेतृत्व म्हणून त्यांना देशाच्या राजकारणात आदराचे स्थान होते. चाकूरकर यांच्या निधनामुळे राजकारण-समाजाकारणात सभ्यता, सुसंस्कृतता जपणारे, लोकशाहीवर गाढा विश्वास असणाऱ्या ज्येष्ठ नेतृत्वाला महाराष्ट्र सुपुत्राला आपण मुकलो आहोत. या क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे मानतो. चाकूरकर कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे. या सर्वांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, ईश्वराने त्यांना हा आघात सहन करण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो आणि ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे.
