शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून आ.शंकरराव गडाख यांचे कौतुक
सोनईकरांनी केलेल्या स्वागतामुळे ठाकरे हे भारावून गेले
। अहमदनगर । दि.13 फेब्रुवारी 2024 । शिवसेना पक्षप्रमुख दोन दिवसांच्या शिर्डी दौर्यावर असून, मंगळवारी त्यांचे सोनई येथे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. सोनईकरांनी केलेल्या स्वागतामुळे ठाकरे हे भारावून गेले होते. सोनईतील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला, या आसुडाचे फटके भाजप आणि गद्दारांच्या पाठीवर बसले. त्यांनी आपल्या भाषणात काय म्हटले ते वाचा.
सोनईमधील सोन्यासारख्या मर्दमावळ्यांनो मी राज्यभर फिरतोय. मी खरंच भारावून गेलो आहे. सत्ताधारी पक्षाच्या सभेला अशी गर्दी समजू शकतो मात्र ज्याच्याकडे पक्ष ठेवले नाही, चिन्ह ठेवले नाही, मी आता काही देऊ शकत नाही तरीही तुम्ही माझ्यावर प्रेम करत आहात मी तुमच्यासमोर नतमस्तक आहे.
मी एक गोष्ट देऊ शकतो तो म्हणजे विश्वास जो त्यांच्याकडे नाही. गद्दारांनी सरकार पाडलं नसतं तर आजही शंकरराव मंत्री असतेच. ते आज तिकडे गेले असते तरी ते मंत्री असते मात्र तुम्ही जे धाडस दाखवलंत त्याला म्हणतात निष्ठा. मला काही मिळो अथवा न मिळो , मला ज्यांनी निवडून दिलं त्यांना मी दगा देणार नाही अशी भूमिका त्यांची असल्याने त्यांच्यावर जनता प्रेम करते.
