मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला नगरमधून पाठिंबा
नगर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू
। अहमदनगर । दि.25 ऑक्टोबर 2023 । मराठा आरक्षणासाठी सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत संपली असून यानंतर पुन्हा जरांगे पाटील हे आराक्षणाच्या लढ्यासाठी उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या या उपोषणाला नगरमधील सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठींबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली 40 दिवसांची मुदत संपली आहे. मात्र, सरकारकडून अद्यापही कोणतीच भुमीका स्पष्ट झालेली नसल्याने पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग जरांगे यांनी स्विकारला आहे. शांततेच्या मार्गाने त्यांनी उपोषण करुन सरकारला जाग आणण्यासाठी सर्वांना आवाहन केले आहे.
सरकारला जाग आणण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आपल्या गावात, शहरात, जिल्ह्यात साखळी उपोषण करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अहमदनगर मधील सकल मराठा समाज व क्रांती मोर्चाच्या वतीने नगर मधील सावेडी आकाशवाणी जवळील तहसील कार्यालया समोर साखळी पद्धतीने आंदोलन पुकारले असून आजपासून या आंदोलनास सुरुवात झाली आहे.
मराठा आरक्षणाच्या लढाई मध्ये आपले योगदान देण्यासाठी सर्व मराठा बांधवांनी रोज जास्तीत जास्त संख्येने येण्याचे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले असून आंदोलनाला मराठा बांधवांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये असल्याने मोदी मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत काय भुमीका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
...अन्यथा अमराण उपोषण
सरकारला चाळीस दिवसांचा वेळ सरकारला देऊनही सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे आता सरकारला वेळ न देता सरकारने लवकरात लवकर आरक्षणाविषयी भूमिका जाहीर करावी अन्यथा येत्या 28 ऑक्टोबर पर्यंत साखळी उपोषण करणार असून त्यानंतर अमरण उपोषणाचा इशाराही यावेळी देण्यात देण्यात आला आहे.
