राजकीय नेत्यांना गावबंदी
आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचा आक्रमक पवित्रा
। अहमदनगर । दि.23 ऑक्टोबर 2023 । राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे जनजागृती करत सभा घेत दिसून येत आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी केल्यामुळे राजकीय नेत्यांची मोठी गोची होतांना दिसून येत आहे.
गावोगावी राजकीय नेत्यांना गावबंदीचा ठराव करण्यात आला. जालना जिल्ह्यातील 215 गावांमध्ये राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असून, तब्बल 25 गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.
गावोगावी राजकीय नेत्यांना बंदी घालण्याचा ठराव संमत करण्यात येत आहे. शिवाय चक्क ग्रामसभा घेत ठराव संमत करत पुढार्यांना गावबंदी करण्यात आली. नेत्यांच्या गावबंदीचे फलक गावच्या वेशीवर, ग्रामपंचायत कार्यालयाजवळ झळकलेत.
अनेक गावांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने नेत्यांची चांगलीच कोंडी झाली. नेत्यांना गावात पाऊल ठेवणे मुश्किल झाले आहे. चुलीत गेले नेते अनं पक्ष, मराठा आरक्षण एकचं आमचं लक्ष्य.. अशा पद्धतीचे फलक गावोगावी लागतांना दिसून येत आहे.
राज्यातल्या तब्बल साडे सहाशे गावात पुढार्यांसाठी नो एन्ट्रीचे बॅनर्सचे लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील करंजी गावातील ग्रामस्थांनी देखील जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे.
करंजी गावच्या युवकांनी गावात फ्लेक्स बोर्ड लावत आजी माजी मंत्री आणि राजकीय नेत्यांना गावात प्रवेशबंदी केली आहे. मराठा आरक्षणावरून राज्यातले वातावरण चांगलच तापतांना दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली.
त्यामुळे मराठा समाजातील व्यक्तींनी आक्रमक भूमिका घेतल्यात.आरक्षणासाठी सरकारला दिलेली मुदत संपण्यासाठी फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या तीन दिवसांनी आरक्षण मिळणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
कोपरगाव तालुक्यातील करंजी गावामध्ये बंदी
अहमदनगरच्या कोपरगाव तालुक्यातील करंजी गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली. चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष अशा आशयाचे बॅनर लावत जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय पक्ष आणि नेत्यांना ग्रामस्थांनी गावात प्रवेश बंदी केली आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यामुळे राज्यभरात मराठा समाज अधिक आक्रमक होताना दिसत आहे. मनोज जरांगे यांनी शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले असून राज्यभरात अनेक गावांनी राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदीचा निर्णय घेतला आहे.
Tags:
Breaking
