। अहमदनगर । दि.01 ऑक्टोबर 2023 । तालुक्यातील सारोळा कासार येथील रहिवाशी गुलाबराव काळे यांचे प्रदीर्घ आजाराने उपचारादरम्यान रविवारी पहाटे खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. सुारे 35 ते 40 वर्ष ते नगर तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रियपणे काम करत होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
उपचारा दरम्यान त्यांची रविवारी पहाटे प्राणज्योत मानवली. अहमदनगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचे ते वडील होत. गुलाबराव काळे यांनी नगर तालुक्यामध्ये आपल्या राजकीय कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. नगर तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य,
इंटक काँग्रेसचे सरचिटणीस, नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक, नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक,जिल्हा कृषक समाजाचे जिल्हाध्यक्ष, अहमदनगर किसान जागरण मंचाचे जिल्हाध्यक्ष अशा विविध महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले होते.
त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित केले होते. यासह ग्लोरी ऑफ इंडिया, कृषी मित्र, समाजभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना विविध संस्थांनी सन्मानित केले होते. त्यांनी 2700 एकर पडीक जमिनीवर सुमारे 20 लाख झाडांचे यशस्वीरित्या वृक्षारोपण केले होते.
याच कामाची दखल घेत देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी स्वतः काळे यांना राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे पाचारण करत त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली होती.त्यांच्या पार्थिवावर 1 ऑक्टोबर रोजी दुपारी अमरधाम, नालेगाव, नगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
Tags:
Ahmednagar
