। अहमदनगर । दि.15 सप्टेंबर । राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कुटूंबियां समवेत सर्जा राजाची पारंपारिक पध्दतीने पूजा करून पोळा सणाच्या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी खा.डॉ सुजय विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील रणरागिणी महीला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्री विखे पाटील उपस्थित होत्या.मंत्री विखे पाटील यांनी सर्जा राजाचे पूजन केले.सौ.शालीनी विखे पाटील यांनी सर्जा राजाला औक्षण करून कृतज्ञता व्यक्त केली.
बैल पोळा सणाच्या राज्यातील शेतकऱ्यांना आणि जनतेला शुभेच्छा देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकट आणि लम्पि साथरोगाच्या पार्श्वभूमीवर पोळा सण साजरा होत आहे. काही मर्यादाही या सणावर यंदा घालाव्या लागल्या आहेत. परंतू कृषि संस्कृतीमध्ये पशुधनाचे असलेले महत्व लक्षात घेवून परंपरा आणि ग्रामीण संस्कृती जतन करीत शेतकरी हा सण साजरा करुन, सर्जाराजा प्रती कृतज्ञता व्यक्त करीत आहेत हा एक आनंदाचा क्षण आहे.
राज्यातील पशुधनाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी राज्य सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. राज्यातील लम्पि संकटात पशुपालकांना सर्वतोपरी मदत केली आहे. मोफत लसिकरण, औषधोपचार देवून पशुधन वाचविण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी पावसाने दडी मारल्याने शेतक-यांपुढे मोठे संकट आहेच, याही परिस्थितीत शेतक-यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, जनावरांसाठी चारा उपलब्ध करणे हा सरकारचा प्राधान्यक्रम आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात चारा उत्पादनासाठी शेतक-यांना बियाणे उपलब्ध करुन देण्याचा निर्णयही शासन स्तरावर घेण्यात आला असल्याचे ना.विखे पाटील म्हणाले.
