। अहमदनगर । दि.08 ऑगस्ट 2023 । अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने पशुपालकांचे अनुदान तातडीने परत द्यावे अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे. जिल्हा सहकारी बँक आणि नाबार्डच्या संयुक्त विद्यमाने सन 2008 मध्ये अनेक पशुपालकांना व्हेंचर कॅपिटल फंड योजनेमधून कर्जवाटप करण्यात आले होते. हे कर्ज संकरित गाई आणि म्हशी घेण्यासाठी देण्यात आले होते.
प्रत्यक्ष शेतकर्याला धारण केलेल्या जमिनीच्या क्षेत्राच्या प्रमाणात जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जिल्हा सहकारी बँकेमार्फत देण्यात आलेले होते. यामध्ये 50% रक्कम बिनव्याजी होती. 40% रक्कम व्याजी होती तर 10% रक्कम संबंधित पशुपालकांनी स्वहिस्सा म्हणून भरायचे होते.या योजनेअंतर्गत असलेल्या पैशांची परतफेड करण्याची मुदत आठ वर्षांची होती. व्याजी दिलेल्या 40% रकमेला 12.50% व्याज होते. शेतकर्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून यापैकी व्याजाची निम्मी रक्कम परत देण्यात येणार होता.
मात्र सन 2008 पासून राबविलेल्या या योजनेचे अनुदानित व्याज अद्यापही जिल्हा सहकारी बँकेने शेतकर्यांना परत दिलेले नाही. शेतकरी विविध कार्यकारी सेवा सोसायटी व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थानिक शाखांमध्ये वारंवार चकरा मारून व्याज अनुदानाची मागणी करत आहेत. परंतु त्यांना जिल्हा बँकेच्या शाखांमधून आणि विविध कार्यकारी सेवा सोसायटी मधून समर्पक व योग्य उत्तरे दिली जात नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यातील ज्या शेतकर्यांनी व्हेंचर कॅपिटल फंड योजना अंतर्गत कर्ज घेतले व त्यांचे व्याज अद्याप देण्यात आलेले नाही .त्या सर्वांचे व्याज अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने तातडीने परत द्यावे अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, अशोक सब्बन, सुनील टाक, भगवान जगताप, कैलास खांदवे, शिवाजीराजे भद्रे, गणेश इंगळे, विलास खांदवे व जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी केली आहे .
Tags:
Ahmednagar
