। अहमदनगर । दि.25 नोव्हेंंबर । तुमच्या खात्यावर पैसे नाही, त्यावर पैसे टाकावे लागेल, त्यानंतर तुम्हाला मोदी सरकारचे पैसे मिळतील, असे म्हणून वृध्द महिलेकडील 10 हजार 300 रूपये काढून घेत फसवणुक केली आहे. सोमवारी सकाळी बागरोजा हाडको परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेरूबाई सखाराम शिंदे (वय 65 रा. पळशी ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी सोमवारी सकाळी पळशी येथून नगरमध्ये आल्या होत्या. डोळ्यांची तपासणी करायची असल्याने त्या रूग्णालयाकडे जात असताना बागरोजा हाडको परिसरात त्यांना एक अनोळखी व्यक्ती भेटला. त्याने फिर्यादी यांच्यासोबत ओळख काढून मी तलाठी असल्याचे सांगितले. तुमच्या खात्यावर पैसे नाही, त्यावर पैसे टाकावे लागेल,
त्यानंतर तुम्हाला मोदी सरकारचे पैसे मिळतील, अशी बतावणी करून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादी त्या व्यक्तीला म्हणाल्या, मी दवाखन्यासाठी व सोनाराला देण्यासाठी 10 हजार 500 रूपये आणले आहेत. त्या व्यक्तीने फिर्यादीकडील 10 हजार 500 रूपये बळजबरीने काढून घेतले व दोनशे रूपये परत दिले. 10 हजार 300 रूपये घेऊन पोबारा केला. फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
दरम्यान गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या पथकाने संशयीत आरोपीला अटक केली आहे. ज्ञानदेव हरीभाऊ चेडे (वय 37 रा. वारूळाचा मारूती, नगर) असे त्या संशयीताचे नाव आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रणदिवे करीत आहेत.