नगर जिल्ह्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार!

नगर जिल्ह्यात यंदा ज्वारीचे उत्पादन घटणार

आजवर केवळ तीन हजार हेक्टरवर लागवड


। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर । राज्यात प्रसिध्द असणार्‍या नगरच्या ज्वारी पिकाचे क्षेत्र यंदा जोरदार पावसाने कमी होण्याचे चित्र दिसत  आहे. यंदाच्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे यंदा ज्वारीची भाकर दुर्मिळ होणार असून, ज्वारीसाठी नगरकरांना आर्थिक चटके सहन करावे लागणार आहेत.

जिल्ह्यात दरवर्षी ज्वारीचे सरासरी क्षेत्र 2 लाख 67 हजार हेक्टर असताना आतापर्यंत 3 हजार हेक्टरवरच्या जवळपास ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट येणार असल्याचे कृषी विभागाचा अंदाज आहे.

राज्याच्या कृषीच्या नकाशावर नगर जिल्हा हा रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परतीच्या दमदार पावसावर जिल्हयातील शेतीचे भवितव्य अवलंबून असते. मात्र अलिकडच्या काही वर्षात नगर जिल्ह्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये पडणार्‍या मान्सूनच्या पावसाचे प्रमाण लक्षणीय वाढते आहे.

यंदा तर पावसाने कहर केला असून, सरासरीपेक्षा 135 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्हयात 15 ऑगस्टनंतर तर काही भागात गोकुळ अष्टमीनंतर ज्वारीच्या पेरण्या सुरु होत्या. मात्र, यंदा ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात जोरात पाऊस कोसळत आहे.

यामुळे शेतकर्‍यांना ज्वारी पिकाची पेरणी करणे अवघड झाले आहे. कृषी विभागाच्या नियोजनानुसार दरवर्षी 15 ऑक्टोबरपर्यंत ज्वारी पेरणीचा कालावधी आहे. मात्र, या कालावधीत जिल्हयातील पाऊस थांबलेला नाही. यामधून विविध समस्यांना तोंड देत पिक कसे पिकवायचे असा प्रश्न असून ज्वारीचे उत्पादनात घट होणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post