19 टन मुगाची परस्पर विल्हेवाट करुन व्यापार्याची सात लाखाला फसवणूक
। अहमदनगर । दि.20 ऑक्टोबर । नगर मार्केट यार्ड येथून 25 टन मुग मालट्रकमधून इंदूर येथे पाठवला असता मालट्रकवरील दोन चालकांनी ट्रकचा अपघात झाल्याचा बनाव करून आतील 19 मुगाची परस्पर विल्हेवाट लावून व्यापार्याची सात लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अन्नधान्य खरेदी विक्री व्यावसायिक योगेश श्रीकांत चंगेडीया (वय 43 वर्षे, रा. प्लॉट नं 95, साईनगर, बुरुडगाव रोड, नगर) यांनी दि.10 सप्टेंबर रोजी जग्गन्नाथ रामभाऊ कोलते (श्री गुरुकृपा ट्रान्स्पोर्ट, नागापूर चौक, गणपती पाईप बिल्डींग, एमआयडीसी, अहमदनगर) यांची गाडी 25 टन मुग इंदौर, मध्यप्रदेश येथे पाठवण्यासाठी ठरवली.
त्यानंतर त्यांची अशोक लेलंड कंपनीची (क्रमांक एमएच 20 इजी 1810) बारा टायरची ट्रक मार्केट यार्ड येथील ऑफिसला आल्यावर त्यावर महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरुन हे दोघे चालक होते. 25 टन मुग गाडीत भरुन व कागदोपत्री पूर्तता करून मार्केटयार्ड येथुन इंदौरला माल पोहचवण्यासाठी पाठवून दिले.
त्यानंतर दि.11रोजी श्री गुरुकृपा ट्रान्स्पोर्टचे कोलते यांचा फोन आला व त्यांनी सांगितले कि, मुग भरुन पाठवलेल्या ट्रकचा इंदौरकडे जात असताना कन्नडच्या घाटात अपघात झाला आहे. त्यानंतर कोलते व दुकानाचे मॅनेजर सुरेश लोखंडे असे दोघेजण कन्नड येथे गेले व तेथे गेल्यावर त्यांनी सांगितले की माल असलेली गाडी कन्नडच्या घाटात खाली पडलेली आहे.
परंतु गाडीतील माल ताडपत्रीच्या आत सुस्थितीत आहे तसेच गाडीवरील चालक महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व त्याचा जोडीदार शेख अल्ताफ शेख हरुन हे दोघेही सुरक्षित आहे, असे सांगीतले. परंतु गाडी खाली करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने गाडी दि.11 ते दि.18 रोजीचे दरम्यान त्याच ठिकाणी होती व त्यावरील चालक व क्लिनर गाडीजवळच होते. त्यानंतर कोलते व लोखंडे यांनी मजुरांच्या मदतीने गाडीतून माल काढला व दुसर्या गाडीत भरुन चाळीसगाव येथे काटा वजन केला.
त्यावेळी गाडीत फक्त 6.5 टन मुग असल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत गाडीचे चालक व क्लिनर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व दादागिरी करून एवढा माल घेवून जायचा असेल तर घेऊन जा, नाहीतर हा माल देखील हाती लागू देणार नाही, असे म्हणून त्यांना दमबाजी केली.
त्यावेळी लक्षात आले की चालक महोम्मद असिफ शेख इब्राहिम शेख व शेख अल्ताफ शेख हरुन यांनी 25 टन मुग मालापैकी 19 टन मुग मालाची अफरातफर करुन विश्वासघात केलेला आहे. त्यानंतर चांगेडिया यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे याबाबत तक्रारी अर्ज केला होता, या तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे.
--------