। अहमदनगर । दि.02 ऑक्टोबर 2022 । खरेदी करण्यासाठी दुकानात आलेल्या दोन व्यक्तींनी दुकानाच्या गल्ल्यातील पैशावर डल्ला मारल्याची घटना तारकपूर परिसरात 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान तीन वेळा घडली.
दुकानातील रोख 13 हजार रुपये या दोघांनी चोरून नेले आहेत. या प्रकरणी 27 सप्टेंबर रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक वलीराम गुरबाणी (वय 49, रा. इंद्रा कॉलनी, तारकपूर) यांनी फिर्याद दिली आहे.
गुरबाणी यांचे तारकपूर येथे सावन मिनी मार्केट हे किरणा दुकान आहे. त्यांच्या शेजारी राजेश हैरीलाल कंत्रोड यांचे आर.के.जनरल स्टोअर्स हे दुकान आहे. 23 सप्टेंबरला गुरबाणी यांच्या दुकानात दोन अनोळखी व्यक्ती आल्या व त्यांनी पेपर डीश मागितले.
गुरबाणी पेपर डीश देत असताना त्यांनी गल्ल्यातील पाच हजार चोरले. यानंतर 25 सप्टेंबर रोजी कंत्रोड यांच्या दुकानातून पाच हजार रुपये चोरले तर 27 सप्टेंबर रोजी पुन्हा या व्यक्ती कंत्रोड यांच्या दुकानात आल्या असता त्यांच्या गल्ल्यातून तीन हजार रुपयांची रोकड लंपास केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.
