माजी नगरसेवकाला मनपाचा दणका
तीन मजली इमारत पाडण्याचा आदेश
। अहमदनगर । दि.14 ऑक्टोबर । मनपा कर्मचारी तसेच माजी नगरसेवक असलेल्या मुदगल कुटुंबियांचे बांधकाम अतिक्रमण व अनधिकृत ठरवून ते पाडण्याचा आदेश मनपा उपायुक्तांनी दिला आहे. या अतिक्रमण विरोधातील तक्रारदार अॅड. गजेंद्र दांगट यांच्या लढ्याला यश आले आहे.
बाबू मुदगल व मुदगल कुटुंबीय यांनी सि.स. नं. 7499 आणि 6052 या जागेवर कोणतीही परवानगी न घेता तीन मजली आरसीसी बांधकाम केले. मनपाची मोठ्या प्रमाणात घरपट्टी बुडवून त्यापुढील येण्या-जाण्याच्या रस्त्यात मोठ्या आकाराचा ओटा बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याची तक्रार अॅड. दांगट यांनी मनपाकडे केली होती.
याप्रकरणी मनपा उपायुक्त यांच्याकडे झालेल्या सुनावणीमध्ये मुदगल कुटुंबीयांनी अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकाम केल्याचे सिद्ध झाले. मुदगल कुटुंबीयांनी स्वतःहून सर्व बांधकाम काढून घ्यावे, अन्यथा मनपामार्फत पाडण्यात येईल. यासाठी झालेला खर्च वसूल करण्यात येईल, असा आदेश उपायुक्तांनी दिला आहे.
गरिबांच्या टपर्या लगेच काढल्या जातात. परंतु अतिक्रमण करुन मनपाची फसवणूक करणार्यांना जावयासारखी वागणूक दिली जात आहे. आणखी एका प्रकरणात कल्याण रोडवर पालिका ओपन स्पेस तसेच महामार्गावरील जागा बळकावून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे.
तर पत्र्याचे शेड टाकले आहे. यातून त्यांना लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. या प्रकरणी तहसीलदार यांच्याकडे सुनावणी सुरु आहे, असे अॅड. गजेंद्र दांगट यांनी म्हटले आहे.
