। अहमदनगर । दि.17 ऑक्टोबर । टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. प्रशांत भाऊसाहेब राऊत (वय 21) आणि रवी भाऊसाहेब राऊत (वय 19, दोघे रा. बुर्हाणनगर, ता. नगर) अशी दोघा मृत भावांची नावे आहेत.
बुर्हाणनगर शिवारातील बाणेश्वर विद्यालयाजवळ रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेतला आहे.
राऊत बंधूंचे बुर्हाणनगर गावात सलूनचे दुकान आहे. दुकान बंद करून ते घराकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला बाणेश्वर विद्यालयाजवळ अपघात झाला. अपघातानंतर या दोघांना येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
मात्र, दोघेही उपचारापूर्वीच मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राऊत बंधूचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने बुर्हाणनगर गावावर शोककळा पसरली आहे.