। मुंबई । दि.08 ऑगस्ट । राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. अनेक दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस यांच्या दिल्ली दरबारी चकरा आता थांबणार आहे. तर भाजपाच्या मंत्रिमंडळात काही नव्या नावांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजभवनावर हा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी शिंदे गटाचे 8 आणि भाजपचे 10 असे 18 मंत्री शपथ घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक झाली. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असावा अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही इच्छा आहे.
शिंदे गट आणि भाजपाचे हे मंत्री असण्याची शक्यता आहे. यामध्ये नगरचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, गणेश नाईक, सुरेश खाडे तसेच गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, शंभूराज देसाई, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आदींच्या नावाची चर्चा आहे.
प्रा.राम शिंदे आणि बबनराव पाचपुंतेचे काय?
प्रा.राम शिंदे हे पहिल्याच यादीत मंत्री असतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना होता. तसाच विश्वास बबनराव पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांना देखील होता. परंतु, या दोनही नेत्यांचे नावे मंत्रीपदासाठी आले नसल्याने दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तर विखे यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याने विखे गटात आनंदाचे वातावरण आहे.
