देशाला भोंग्या ऐवजी शाहू चरित्राची गरज : पांडूळे
बरोबर सकाळी १० वा अहमदनगरकरांकडून राजर्षींना १०० सेकंद अभिवादन
। अहमदनगर । दि.08 मे । छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक येथे आज सकाळी बरोबर दहा वाजता १०० सेकंद स्तब्ध उभे राहून राजर्षी शाहू महाराजांना शताब्दी पुण्यतिथीनिमित्त शेतकरी कुटुंबांकडून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेच्या वतीने करण्यात आले होते, यावेळी ज्ञानदेव पांडुळे हे अध्यक्षस्थानी होते.
ते म्हणाले सध्या देशात फक्त भोंगे आणि भावनिकतेचे राजकारण सुरू आहे. सध्या प्रत्येक घराला भाकरीची आणि हाताला कामाची गरज आहे. यासाठीच देशाला शाहू चरित्राची आवश्यकता आहे तरच देशाची अखंडता टिकेल. राजर्षी शाहूंनी तोफा वितळून शेतकऱ्यांसाठी नांगर बनवले, राधानगरी धरणाची निर्मिती करून शेतकऱ्यांना पाठबळ दिले,आधुनिकतेची व सहकाराची मुहूर्तमेढ रोवत शाहू मिलची स्थापना केली.
त्यातून व्यापार-उदीम वाढवला,भारतातील पहिले आरक्षण धोरण राबवत कमकुवतांना प्राधान्य देत कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर काढून शिक्षण दिले. यासाठी त्यांनी देशभरात विविध शैक्षणिक संस्था सुरू केल्या. कुस्तीला प्रोत्साहन दिले. राजर्षी हे काळाच्या पुढे शंभर पावले होते.देशातील सर्वाधिक शिक्षणावर खर्च करणारे हे एकमेव कोल्हापूर संस्थान होते, अशी माहिती शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितली.
दरम्यान भैरवनाथ वाकळे यांनी खंत व्यक्त केली की राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणाची संकल्पना राबविली; परंतु आरक्षणाचे लाभ घेणारे मात्र राजर्षी शाहू महाराजांना विसरले आहेत. कार्यक्रमात स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर रोष व्यक्त करत म्हटले की राजर्षी शाहू महाराज व अहमदनगरचे नाते अतूट आहे हे माहित असून देखील पालकमंत्र्यांनी अहमदनगरच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केले ही खेदाची बाब आहे.
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने संपूर्णा सावंत व अनुराधा येवले यांनी छत्रपतींना अभिवादन केले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब पवार विनीत पाऊलबुद्धे यांनी देखील राजश्री शाहू महाराजांबद्दल आपले विचार व्यक्त करत छत्रपतींना अभिवादन केले.अभिवादनास अभिजीत वाघ, आसिफ खान दुले खान,डॉ अविनाश मोरे, इंजि.श्रीकांत निंबाळकर, सदाशिवराव निर्मळे,रिनुल नागवडे, अभिजित दरेकर,भूषण तोडमल, संकेत म्हस्के,तेजस बोरूडे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.