सावेडीत घरफोडी करणारा स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद!



। अहिल्यानगर । दि.25 डिसेंबर 2025 । सावेडीतील विराज कॉलनी येथे 14 लाख 75 हजार रुपये किमतीची घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. रफिक मेहबुब शेख (वय 43, रा. पहिली राबोडी, बापुजीनगर, राबोडी, ठाणे वेस्ट) असे त्याचे नाव आहे. त्याच्या दोन साथीदार फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.

फिर्यादी अशोककुमार विजयकुमार अग्रवाल (वय 50 रा. विराज कॉलनी, सावेडी) हे नातेवाईकांकडे बाहेर गावी गेलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागील दरवाजाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. लॉकर व कपाटातील सोने, चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा एकुण 14 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर चोरीची घटना घडल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि किरणकुमार कबाडी यांनी घटनाठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. सदरचा गुन्हा रफिक शेख व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली.

त्यानुसार ठाणेयेथे जात आरोपीचा शोध घेत असताना तो राबोडी (जि. ठाणे) येथे असल्याची माहिती मिळाली. तेथून त्यास ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार सुरेश माळी, शाहिद शेख, गणेश धोत्रे, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, रोहित येमुल, अमृत आढाव, सोनाली भागवत यांच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपी रफिक मेहबुब शेख हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचेविरुध्द यापूर्वी सातारा, ठाणे, सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post