गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार
गुटखा, तत्सम प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्याचे होणार निलंबन
। मुंबई । दि.25 डिसेंबर 2025 । राज्यात बंदी असलेल्या गुटखा आणि तत्सम अंमलीपदार्थांवर कडक कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग सज्ज झाला आहे. यापुढे बंदी असलेले प्रतिबंधित पदार्थ सापडल्यास त्या संबंधित क्षेत्रातील अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिला.
अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री होत आहे, असे निर्दशनास आल्यास त्या कार्यक्षेत्राच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकही मंत्री झिरवाळ यांच्या निर्देशानंतर काढण्यात आले.
या अंतर्गत सर्व विभागीय सह आयुक्त (अन्न) यांना प्रतिबंधित अन्नपदार्थांची छुप्या पद्धतीने व अवैध मार्गाने विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकावर प्रभावीपणे कारवाई करण्याचे आदेश अन्न सुरक्षा आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांनीही परिपत्रकाद्वारे दिले आहेत.
सह आयुक्त (अन्न), सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकारी यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील अन्न आस्थापनांची तपासणी करावी. तसेच त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठा व वितरण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी व प्रतिबंधित अन्नपदार्थांचे बंदीबाबत आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.
